भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली येथील अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग व स्पर्धा परीक्षा केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने ‘स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी व संधी’ या विषयावर दि. ११ जून २०२१ रोजी एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. राधाकिसन देवढे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण विभाग, अहमदनगर हे उपस्थित होते तर अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे यांनी भूषविले. प्रारंभी अंतर्गत गुणवत्ता हमी विभाग प्रमुख डॉ. अमित सुपले यांनी कार्यशाळेचा हेतू विषद करत महाविद्यालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षेसंदर्भात राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना श्री. राधाकिसन देवढे म्हणाले की, शासकीय सेवेत रूजू होण्यासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना सामोरं जावं लागतं. मात्र विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी कठोर मेहनत घेण्याची तयारी ठेवावी. यूपीएससी, एमपीएससी, पी. एस. आय., एस. टी. आय., सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, सरळ सेवाभरती या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करायचा, या परीक्षांचं स्वरुप कसं असतं, वयोमर्यादा काय असते, अभ्यासाचं नियोजन कसं असाव असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतात. नियोजनपूर्वक अभ्यास करणं गरजेचं आहे, आव्हानात्मक क्षेत्र असलं तरी नियोजन करून अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणं कठीण नाही. कोणत्याही पदवी अभ्यासक्रमासोबत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला तर पाया पक्का होतो आणि पुढे परीक्षेचा मुख्य अभ्यास करणं कठीण जात नाही. इतर सर्व परीक्षांचे पाठ्यपुस्तक तुमच्याकडे असतं. पण स्पर्धा परीक्षांसाठी असं कोणतही ठराविक पाठ्यपुस्तक नसतं. अभ्यासक्रम दिला जातो. तो विस्तृत स्वरुपात असतो. त्यात मोडणाऱ्या, त्याच्याशी निगडीत असलेल्या सर्व गोष्टी परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. तेव्हा जुन्या प्रश्नपत्रिका पाहा. कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते समजून घ्या.
अध्यक्ष म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कोणत्याही समस्येला सामोरं जायला शिकले पाहिजे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना तुम्ही विचार कशा पद्धतीने करता हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपल्या विचारांची बैठक पक्की करण्यासाठी प्रयत्न करा. आजुबाजूच्या सगळ्या घटनांचा, स्थित्यंतरांचा आपल्या अभ्यासाशी संबंध जोडता आला पाहिजे. अभ्यास कसा आणि कोणत्या गोष्टीचा करायचा याबरोबरच कोणत्या गोष्टींचा करायचा नाही, हे देखील लक्षात ठेवलं पाहिजे. देशपातळीवरच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं पाहिजे. संदर्भ शोधण्याकडे मन धावलं पाहिजे. वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या वाचून सोडून देण्यापेक्षा त्या बातम्यांमागील संदर्भ शोधून आपला अभ्यास, स्मरणशक्ती आणि माहितीचा साठा वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जरी स्पर्धा परीक्षेत अपयश आले तरी प्लॅन- बी तयार ठेवला पाहिजे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डॉ. नितीन विनायक गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. टी. आर. सावंत, विज्ञान प्रमुख डॉ. प्रभा पाटील, कॉम्पुटर विभागाचे श्री. अमोल वंडे तसेच महाविद्यालयातील व इतर महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
सदर व्याख्यान आपणास YOUTUBE ला पाहता येईल: https://youtu.be/6nBJbMwz8GY
No comments:
Post a Comment